कोल्हापूर दर्शन: माझ्यावर नजरेतून

काल संध्याकाळी गावाकडून सागर पाटलांचा फोन आला. "हं मी येतोय उद्या, रुपनारायण बघायला." माझा 'रुपनारायण' हा लेख वाचल्यापासून हा सारखा म्हणतोय, "आपण एका रविवारी जाऊया हं." तो रविवार आज आला.
त्यानं कालच सांगितलं होतं, "जायचं तर चालत." त्याप्रमाणं कोल्हापूरच्या रेल्वे फाटकापासून आमची पायी यात्रा चालू झाली. ठरल्याप्रमाणे पहिला आम्ही रुपनारायणाची वाट धरली. अर्थातच वाट दाखवायला गुगलच्या त्या मॅडम होत्याच. तिथे गेल्या गेल्या मी ते दोन शिलालेख दाखविले, मग काय पाटलांनी ते मन लावून वाचून काढले. आत जाऊन आम्ही त्या नयनरम्य सप्तफणाधर परमदिगंबर रुपनारायणाचे दर्शन घेतले. क्षणभर आत बसल्यानंतर आम्ही बाहेरून मंदिर पाहिलं. शिलहारांनी रचलेले ते मोठमोठे दगड, त्या दगडांना आधार देणारे भव्य खांब हे सगळं अद्भुत होतं. त्या भिंतींना हात लावत फिरताना आम्हाला एक जाणवलं, की मंदिराचं कोरीवकाम करण्यासाठी वापरलेली अवजारे नक्कीच प्रगत होती. एकएक कट अजूनही तेवढाच तीक्ष्ण आहे. सजावट व नक्षीकाम थोडं कमी आहे, जे आहे ते मागच्या निम्म्या भागात आहे. त्यावरून आम्ही महान इतिहासकारांनी (just joking) निष्कर्ष काढला की मंदिराचं काम हळूहळू होत गेलं असावं, शिलालेखात लिहल्याप्रमाणे व्यापरावरचा कर जसा गोळा होत गेला त्यानुसार बांधकाम होत गेलं असावं. व अचानक आलेल्या काही अडचणींमुळे दर्शनी भागातील नक्षीकाम राहिलं असावं. या चर्चा करत आम्ही मंदिराच्या मजबूत चौथऱ्यावर बसलो होतो. त्यानं विचारलं अजून एखादं बघण्यासारखं काय हाय काय?
एक नेमीनाथ मंदिर हाय, तिथेच रंकभैरव मंदिरपण हाय दोन्ही एकाच कॅम्पस मध्ये आहेत. पण कूट हाय ते काय माहीत नाही.
मग काय आम्ही एकमेकांकडे पाहत स्मितहास्य करत मोबाइल बाहेर काढले आणि रंकोबा डेस्टीनशन टाकलं, फक्त 850 मीटर अंतर आणि 15 मिनिट वेळ लागेल असं गुगलनं सांगितलं. अकराव्या मिनिटाला आम्ही तिथे पोचलो. तिथलं भव्य नेमीनाथ मंदिर शेजारी अवघ्या वीसएक फुटावर काटकोनात रंकोबा मंदिर, दोन्ही अतुलनीय!
आत गेल्यावर त्या मनोहर नेमीनाथाचं दर्शन घेतलं, पण मनात एक शंका होती ही दोन मंदिरं एकत्र कशीकाय? मी एकाला विचारलही! त्यांनी म्हटलं, इतिहास खूप वेगळा आहे, न विचारलेलाच बरा! पण नेमीनाथ कडक हाय!'
आजच मला कळलं तीर्थंकरपण कडक असतो ते. मी काय ते खूप मनावर घेतलं नाही. मला माहित आहे वीतरागी साम्यभावी असतो, त्या प्रचंड मोठ्या दगडी वेदीवर बसलेल्या चीरतपस्येतल्या काळ्या नेमीनाथाला पाहिल्यावरही तसंच वाटलं.
बाहेर येऊन तिथल्या पंडितांशी बोलणं झालं, चर्चा झाली. खूप आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या त्यांनी. एकेकाळी कुणीतरी नेमीनाथाला खंडित करून बाहेर कुठेतरी टाकलं होतं, खूप वर्षांनंतर कुणाला तरी साक्षात्कार झाला अन् त्याची पुनःस्थापणा झाली. आणखी एक गोष्ट इथे कळली, इथून एक भुयार आहे म्हणे. ते भुयार इथल्या एका प्रसिद्ध मंदिरापर्यंत आहे. (हे प्रसिद्ध मंदिर, कोल्हापुरात सापडलेल्या ताम्रपत्रानुसार शांतीनाथ मठ आहे, पण आज ती मूर्ती टाऊन हॉल संग्रहालयात आहे). काहीजण असेही म्हणतात की त्या भुयारात खूप मोठी संपत्ती आहे. सत्तर वर्षांपूर्वी दोन व्यक्तींनी त्यात प्रवेश केला होता, ते दोघे चार दिवसांनी परत आले. पण आत काय दिसलं हे ते सांगू शकले नाहीत; मात्र ते गुपित स्वतःजवळ ठेऊन दोघेही या पृथ्वीतलावरून चारच दिवसात निघून गेले म्हणे.
सत्य काय ते देवाला माहीत! आम्हाला मात्र मंदिर खूप आवडलं. नेमीनाथाला डोळेभरून पाहतच रहावं असं वाटत होतं.
अजून आमच्याकडे वेळ भरपूर होता. आम्ही लक्ष्मीसेन मठात जायचं ठरवलं, तेही 10 मिनिटाच्या अंतरावर होतं. गुगल वाट दाखवेल तसे निघालो.
मठाचे भव्य प्रवेशद्वार एका नजरेत मावत नाही इतकं मोठं आहे. मठही तसाच मोठा आहे. भट्टारक स्वामींच्या द्रष्ट्या नेतृत्वात इथे साहित्य परिषद, ग्रंथालय, अश्या अनेक संस्थांची निर्मिती झाली आहे. इथली ज्वालामालिनी देवीची मूर्ती खूपच सुंदर आहे. नवरात्र व त्यात देवीचा वार रविवार असल्याने अळंकार पूजेची तयारी जोरात चालू होती.
नंतर आम्ही टाऊन हॉलला गेलो. कोल्हापुरात झालेल्या उत्खननात सापडलेल्या अनेक वस्तू, मुर्त्या, तसेच अनेक कलाकारांनी काढलेली चित्रे, कोरलेली शिल्पे तिथे ठेवली आहेत.
पाचच्या सुमारास तिथून निघालो दसरा चौक मार्गे परत फटकाला आलो, येताना मित्राला विचारलं कसं वाटलं रे? तो म्हणाला "लई भारी वाटलं बघ! दिवस लई छान गेला, आज तृप्त झाल्यासारखं वाटतंय! इतिहासात डोकावल्याचा आनंद मिळाला बघ मला!
पण एक खंत राहिली आम्हाला केसापुर मंदिर, जिनसेन मठ व लक्ष्मीसेन याची भेट या तीन गोष्टी जमल्या नाहीत. "पुन्हा कधी आलो तर तेही करू" असं म्हणून आम्ही मनाचं समाधान करून घेतलं.
आज सात तास चालत फिरलो. तेही न जेवता! पाय थोडे दुखू लागलेत, पण आज त्या रुपनारायणाकडून घेतलेलं तेज आणि मनोहर नेमीनाथाकडून घेतलेली स्फूर्ती यांमुळे मी ते दुखणं विसरलोय!

ता.क.
येतायेता एक जाहिरात आठवली, त्यात बच्चन म्हणतो कुछ दिन गुजारो गुजरातमे.
आजच्या भटकंतीमुळे हेच वाक्य मी बदलून म्हटलं, कुछ घंटे चलते चलते घुमो कोल्हापूर में........
©सुरज मडके

2 comments:

रामानुजन: 'अनंत' पाहिलेला अवलिया

अनंत किंवा इंफिनिटी (infinity) हा शब्द माहीत नाही असा व्यक्ति या जगाच्या पाठीवर क्वचितच असेल. किंबहुना अनंत म्हणजे नेमकं किती हा प्रश्न प्र...