स्ट्रगल, साथीदार आणि आपण


स्ट्रगल, साथीदार आणि आपण 
चारएक दिवसापूर्वीची गोष्ट आहे, आम्ही रिसर्च स्टूडंट एकत्र बसलो होतो. बसल्याबसल्या चर्चा रंगल्या. चर्चेच्या एका वळणावर एका मित्रानं साथीदाराचा विषय काढला. लग्न करण्याचं योग्य वय काय? लग्न कधी करावं? कसं करावं? अश्या अनेक प्रश्नांवर प्रत्येकानं मतं मांडली. एकानं म्हटलं "तुमच्या struggle च्या काळात तुम्हाला साथीदार पाहिजे". संघर्षात तुम्हाला साथीदार असेल तर तो त्यात भागीदार होतो आणि संघर्ष निम्मा करतो.
वाक्य ऐकायला चांगलं होतं, असं असायला हरकत नाही. पण असं होत नाही ना! त्यामुळे मी आणि एकाने विरोधाची बाजू घेतली. वाढलेल्या अपेक्षा-attitude यावर आम्ही बोललो. त्यावर पुढचे दोघे idealism सांगू लागले. मग काय? चर्चेचं रूपांतर वादात! Idealism विरुद्ध Reality!
आदर्शवाद सांगणाऱ्यांचं काही चुकीचं होतं असं मी म्हणणार नाही कारण आज ती काळाची गरज आहे. दोन सुशिक्षित साथीदार काम करून पोटापुरता पैसा मिळवू शकतात. उत्तम संसार करू शकतात. जगण्यासाठी काय लागतं? पोट चालवण्याइतका पैसा आणि एकमेकांवर प्रेम असलं की जगणं सुंदर होतं, संसार सुखाचा होतो.
पण! हा आदर्शवाद मानणारे लोक खूप कमी आहेत असं आमचं मत होतं. Struggle करणाऱ्याला आपली लेक द्यायला कुणीही तयार होत नाही. प्रत्येकाला आपला जावई लखपती, कोट्यधीश किंवा MNC कंपनीत मोठ्या पदावर असणारा पाहिजे असतो, कारण त्यांचं म्हणणं असतं, "आम्ही कमी पैशात दिवस काढलेत, माझ्या लेकीला ती झळ बसू नये."
कोल्हापूर-सांगली पट्ट्यात तर वरच्या अटीसोबत ४-५ एकर शेतीपण लागते.
यावर लगेच एकानं मला विचारलं "तुझं रान किती?"
मी म्हणालो "लई नाही ५-७ एकर हाय."
"मग गप्प बस की, होतय तुझं लगीन."
"अरे भावा मला माझी नाही रे बाकीच्यांची काळजी हाय."
अशाच हास्यविनोदात एकानं 'sample space' ही संकल्पना मांडली. खूप सुंदर आहे ही संकल्पना!
सर्व समाजातील सर्व व्यक्ती: सर्वात मोठा sample space (macro sample space)
आपल्याच समाजातील व्यक्ती: थोडा छोटा sample space
आपल्याच जातीतील व्यक्ती: आणखी छोटा
आपल्याच बरोबरीतील व्यक्ती: आणखी छोटा
आपल्याच बरोबरीनं शिकलेली: आणखी छोटा
सुंदर: आणखी छोटा
समजूतदार: सर्वात छोटा (micro sample space)
आपण आपल्याच आडमुठेपणामूळे हा sample space, macro चा micro करू लागलोय. त्यामुळे मोठा sample space मान्य करा आणि संसाराला लागा. अशी ही theory.
Sample space theory नुसार आपण सर्वसमावेशक असलं पाहिजे. म्हणजे इथे पुन्हा idealism आदर्शवाद आला. पण समाजमन ही theory का मान्य करेल?
एवढयावर चर्चा संपली, सगळे आपापल्या कामासाठी निघून गेले. पण विचारचक्र चालू होतं.
विचार केला, आपला समाज हे मान्य करत नाही. पण नाकातोंडाला आल्यावर हेच लोक प्रतिहुंडा देऊन कर्नाटकातून साथीदार आणतात. काय म्हणायचं ह्याला????
वास्तव! खूप वेगळं आहे.
©सुरज मडके


No comments:

Post a Comment

रामानुजन: 'अनंत' पाहिलेला अवलिया

अनंत किंवा इंफिनिटी (infinity) हा शब्द माहीत नाही असा व्यक्ति या जगाच्या पाठीवर क्वचितच असेल. किंबहुना अनंत म्हणजे नेमकं किती हा प्रश्न प्र...