आज दिवसभर कर्नाटकातील शमनेवाडी येथे होतो, निमित्त होतं प्रथमाचार्य शांतीसागर पुण्यतिथीचं. तो नेत्ररम्य सोहळा मनाला भुरळ घालणारा. दहाबारा रथ, हत्ती, वीसभर घोडे, वीस ते पंचवीस ढोलताशा व झांजपथके (महिलांचेपण) असा लवाजमा घेऊन निघालेली ती रॅली जवळजवळ चार किमी लांब, त्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा, ढोल ताशे वाजवताना त्याच्या पानांसोबत वाजवणाऱ्यांची बोटंपण फुटायची, पण तेच रक्तबंबाळ हात पुन्हा वाद्यावर पडायचे, पण त्यांना त्याचं भान नव्हतं, मग कुणीतरी येऊन पट्टी बांधायचा, पण आमचा कार्यकर्ता थांबत नव्हता, शेवटी शेतात नांगर धरणारे हात ते, त्यांना कसलं आलंय दुःख. त्यांचं नाचत उड्या मारत (होय उड्या मारतच) ढोल वाजवणं चालूच राहिलं. हे झालं आमच्या कार्यकर्त्यांचं, आमच्या रणरागिणीपण काही कमी नव्हत्या, रोज लाटनं आणि उलातणं बाळगणाऱ्या हातातही आज ढोल ताशे व झेंडे होते. लहान मुलींपासून वृद्ध महिला सक्रिय सहभागी होत्या. एक आज्जी, सत्तर वयाची असेल, ती हातात झेंडाघेऊन मुलींच्या एका पथकासमोर मिरवत होती, जणू काय ती त्या मुलींना एकप्रकारे प्रोत्साहनच देत होती. आणि विशेष सांगायचं म्हणजे सकाळी १०ला सुरु झालेली ही मिरवणूक दुपारी ३च्या सुमारास संपली, पण भर उन्हातही त्यातल्या एकाही वाघिणीने सावलीची आस धरली नाही. तिथे जमलेल्या दोन लाख लोकांची मनं जिंकली या कार्यकर्त्यांनी. या रॅलीत वाद्यवृंदाबरोबरच चित्ररथ व देखावेदेखील होते त्यात दक्षिणेतील जैन संस्कृतीसोबत स्त्रीभ्रूणहत्या, शेतकरीआत्महत्या, स्वदेशी, स्त्रीशक्ती इत्यादी ज्वलंत विषय मांडले होते.
तीनला मुख्य सोहळा सुरु झाला, अध्यक्ष रावसाहेब पाटील, कल्लाप्पाण्णा आवडे, अरविंद मजलेकर, खा. राजू शेट्टी, खा. प्रकाश हुक्केरी, आ. गणेश हुक्केरी, आ. संजय पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमास सुरवात झाली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या प्रमुख अतिथी होते. पण अनारोग्यामुळे ते येऊ शकले नाहीत. कार्यक्रम म्हटलं कि सत्कार आलाच, जेव्हा खा. हुक्केरी यांचं नाव घेण्यात आलं तेव्हा तो पिळदार मिशीचा व भरदार शरीरयष्टीचा माणूस आपल्या पहाडी आवाजात म्हणाला (कानडीमध्ये) "ना मुंदिन कार्यक्रमगे मुख्यमंत्रीगे तराव मती सत्कार त्वगुळाव" म्हणजे पुढच्या कार्यक्रमात मी मुख्यमंत्र्याला घेऊन शमनेवाडीला येईन तेव्हाच सत्कार घेईन. काय तो टाळ्यांचा कडकडाट, एका वाक्यात सर्वांची मनं जिंकली ह्या माणसानं. नंतर झालेल्या राष्ट्रसंत आचार्य गुणधरनंदी यांच्या प्रवचनावेळी तर सर्वांच्या नयनात पाणी, अंगावर शहारे आणि रक्तात सळसळ भरली. खरंच प्रवचन ऐकावं तर जैन मुनींचंच, खरंच खूपचं सडेतोड असतं ते. नंतर आम्ही ऐकलं ते राजू शेट्टींना, खूपच लोकप्रिय माणूस (कर्नाटकातही), ते भाषणाला उभे राहिले अन टाळ्या व शिट्यांचा एकच आवाज चालू झाला. ज्या माणसामुळे आमच्या उसाला 3000 भाव मिळाला त्यासाठी हे साहजिक होतं. शेवटी नंबर होता आ. संजय पाटलांचा. संजय पाटील मूळचे महाराष्ट्रातील हालोंडीचे पण सद्या ते बेळगावचे आमदार आहेत. इथे शेट्टी व पाटील दोन राजकारण्यांची भाषणे झाली, पण त्यात राजकारणाचा लवलेशही नव्हता, ते दोघेही आज राजकारणी नव्हते, असतील तर ते फक्त धर्मकारणी व धर्मप्रेमी.
शेवटी संध्याकाळी ५वाजता तिथून निघालो, तिथल्या गोड व आनंददायी आठवणी घेऊन. पुढच्या वर्षीच्या सोहळ्याची सोनेरी स्वप्नं रंगवत.
विशेष: हा पुण्यतिथीचा सोहळा दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी होत असतो, या वर्षी तो सन्मान धर्मनगरी शमनेवाडीला मिळाला. किमान २लाख भाविकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला, किमान१५ लाख रुपये खर्च झाले, काहींना प्रश्न पडेल की एवढं सगळं कशासाठी?
ज्या चरित्रचक्रवर्ती प्रथमाचार्यशांतीसागर महाराजांनी (पूर्वश्रमीचे नाव:सातगोंडा भीमगोंडा पाटील), खंडीत झालेली जैन मुनिपरंपरा पुनःस्थापित केली, आम्हाला आमच्या खऱ्या मानव धर्माची ओळख करून दिली, जे धर्माच्या अस्तित्वासाठी दिल्लीच्या तख्ताला भिडले, ज्यांनी आमचा स्वाभिमान जागा केला व ज्यांच्या पुण्याईमुळे आमचे जैनत्व सिद्ध झाले त्या पुण्यात्माच्या स्मृतिप्रीत्यर्थ "इतना तो बनता है ना?"
No comments:
Post a Comment