ती आई कुठे गेली?

मला तो दिवस अजून आठवतो! मी बाहुबली आश्रमात असताना दहावीतली गोष्ट आहे, संध्याकाळी जेवण संपल्यावर डोंगरावरती फिरायला गेलो होतो. ६:३० वाजले असतील डोंगरावरून खाली येत होतो, दोन चारच पायऱ्या शिल्लक होत्या, इतक्यात एक आवाज आला, "ए पोरांनो कुठे गेला होता?" आम्ही अचंबित होऊन त्या आवाजाकडे पाहिलं तर तो कापरा आवाज गजाबेन यांचा होता. आम्ही जवळ गेलो, आदरयुक्त भीतीमुळे आम्ही सगळेच घाबरलो होतो. एकानं उत्तर दिलं "डोंगरावर गेल्तो".
"काय?" त्या परत म्हणाल्या. त्यांना थोडं ऐकू कमी यायचं.
कुणीतरी परत सांगितलं "डोंगरावर फिरायला गेल्तो."
"बरं बरं!" त्या म्हणाल्या.
लगेच त्यांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला व म्हणाल्या "चष्मा लागलाय?"
मला नुकताच चष्मा लागला होता.
त्या म्हणाल्या "माझं वय ९५ आहे, मी अजून चष्मा वापरत नाही. अजून एकही दात पडला नाही, आणि तुम्ही बघा, १५-१६ व्या वर्षीच चष्मा लागतो तुम्हाला."
आम्ही काय बोलणार! आम्ही नुसतेच मान हालवत होतो.
"पोरांनो, जरा स्वतःची काळजी घेत चला." माझ्याकडे बघून "रोज सकाळी सकाळी जरा डोळ्यावर गार पाणी मारून घेत जा"
(मी नंतर तो उपाय केला, आणि खरंच एका महिन्यात माझा नंबर कमी झाला. आणि मी अजून चस्मा वापरला नाही.)
असंच बोलणं चालू होतं, गुरुदेव समंतभद्र महाराजांच्या आठवणींमध्ये आम्ही रंगलो होतो. अचानक त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक, त्या म्हणाल्या "चला पोरांनो, मी तुम्हाला रत्नमूर्ती दाखविते." आम्ही खूष, जी गोष्ट आम्हाला फक्त ऐकून माहीत होती ती आम्ही आज याची डोळा बघणार होतो. आम्ही त्याच्या मागे मागे जात होतो, त्यांनी आम्हाला ती मूर्ती दाखवली. तिच्या तेजापुढे आमचे डोळे दिपले होते, आम्ही ती मूर्ती डोळ्यात साठवून घेत होतो कारण हे भाग्य आम्हास परत लाभेल की नाही हे आम्हाला माहित नव्हते. सात वाजले होते, सामायिकाची घंटा झाली, ती घंटा का झाली? कदाचित आमचं इतकंच भाग्य आहे अस आम्हाला वाटलं. आम्ही तेथून निघालो. त्यावर गजाबेन म्हणाल्या "कुठे चाललात?" आम्ही कारण सांगितलं.
स्वतःची पोरबाळ नसताना गुरुकुलातल्या पोरांवर जीव ओवाळून टाकणारी आमची माय ती! तिलाही दुःख झालं त्यावेळी. "थोडं थांबा रे!" असं म्हणत असताना त्यांचा जड झालेला गळा आम्ही पहिला. मग आम्हीही थांबलो. त्यांनी मग आम्हाला चांगुलपणाच्या चार गोष्टी सांगितल्या. साडेसात वाजता आम्ही निघालो, सामायिकावेळी आमची गैरहजेरी लागली होती, आम्हाला साडेनऊ वाजता अधीक्षकांनी बोलवून घेतलं. आम्ही कुठेतरी बाहेर गेलो होतो असं त्यांना वाटलं होतं, पण घडलेला किस्सा सांगितल्यावर त्यांनी आम्हाला जाऊ दिलं.
काल जेव्हा गजाबेन आपल्यातून निघून गेल्याचं कळलं तेव्हा हा सारा प्रसंग एका क्षणात आठवला.
गजाबेन यांच्या जाण्याने आज सारा गुरुकुल परिवार पोरका झालाय.
बाहुबलीत गेल्यावर, पांढऱ्याशुभ्र साडीत दिसणारी; वयाच्या शंभरीनंतरही ताठपणे चालणारी आमची आई आम्हाला परत दिसणार नाही, या विचारानचं मन सुन्न झालंय.😢

No comments:

Post a Comment

रामानुजन: 'अनंत' पाहिलेला अवलिया

अनंत किंवा इंफिनिटी (infinity) हा शब्द माहीत नाही असा व्यक्ति या जगाच्या पाठीवर क्वचितच असेल. किंबहुना अनंत म्हणजे नेमकं किती हा प्रश्न प्र...