काही
दिवसांपूर्वी कोल्हापूर जवळच्या कसबा बीड
येथे वीरगळ संग्रह पाहण्याची संधी मिळाली. काहींना वीरगळ हा प्रकार कदाचित माहीत
नसेल. वीरगळ म्हणजे युद्धात हौतात्म्य आलेल्या वीराच्या स्मरणार्थ कोरलेलं एक दगडी शिल्प असतं, त्या शिल्पात युद्धप्रसंग
व त्या वीराचं स्वर्गारोहण दाखवलेलं असतं. वीरगळात मुख्यत्वेकरून एकावरएक असे तीन भाग
असतात. काही वीरगळ चार-पाच भागांचेही असतात. मात्र तीन भागांचे वीरगळ मोठ्याप्रमाणात
सापडतात. सर्वात खालच्या भागात योद्धा धारातीर्थी पडताना दाखविलेला असतो, त्या वीराला
हौतात्म्य नेमकं कसं आलं म्हणजे त्याच्याकडे कोणतं शस्त्र होतं, त्याला कोणत्या शस्त्राने
मारलं गेलं हे दाखविलेलं असतं. मधल्या भागात स्वर्गातील अप्सरा (किंवा देवदूत) त्याला
स्वर्गात घेऊन जातानाचा प्रसंग असतो. वरच्या भागात तो वीर स्वर्गात इष्टदेवाची पूजा
करत असल्याचे दाखवलेले असते. हे शिल्प अडीच ते तीन फुट उंचीचे असते. वीरगळ हा प्रकार
कर्नाटकातून महाराष्ट्रात आला अशी मान्यता आहे. कानडी भाषेत याला वीरकल्लू (वीराचा
दगड) असे म्हणतात. वीरगळ कोरण्याची परंपरा इ. स. पूर्व तिसऱ्या शतकापासून इ. स. अठराव्या
शतकापर्यंत अस्तित्वात होती.
आजपर्यंत सापडलेल्या सर्वच वीरगळात वरच्या भागात वीर स्वर्गात
शिवलिंगाची पूजा करीत असल्याचे दाखविले आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कोल्हापुर व
परिसरात अनेक वीरगळ सापडले आहेत. इतर वीरगळांप्रमाणे त्यातही शिवलिंग दाखविले आहेत.
मात्र कोल्हापुरातल्या नूतन मराठी विद्यालयाजवळच्या विठ्ठल-ओंकारेश्वर मंदिर परिसरात
असलेला एक वीरगळ इतरांहून थोडा वेगळा दिसतो. तीन भागांच्या ह्या वीरगळातील खालचे दोन
भाग स्पष्ट आहेत व वरच्या भागाचा अगदी थोडा भाग दिसतो. खालच्या भागात हत्तीवरील योद्ध्याकडून
एक वीर धारातीर्थी पडताना दिसतो, मधल्या भागात अपेक्षेप्रमाणे त्याचं स्वर्गारोहण आहे,
तिसरा भाग तुटल्यामुळे तो स्पष्ट नाही मात्र वरच्या भागात पद्मासन घातलेल्या देवाची
प्रतिमा असावी असे वाटते, कारण वरच्या भागातील पद्मासन अवस्थेतील पाय स्पष्ट दिसतात.
कोल्हापूरचा प्राचीन इतिहास, उत्खननातील विविध ऐतिहासिक पुरावे व तो वीरगळ जेथे आहे
त्या परिसरातील वास्तू यांचा विचार केल्यास त्या वीरगळात पद्मासनस्थ जैन तीर्थंकर प्रतिमा
असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापुरात बाराव्या शतकापर्यंत चालुक्य व शिलाहार
ह्या जैन राजवटी होत्या त्यामुळे ही शक्यता अधिक प्रबळ होते. कदाचित तो जैन वीरगळ असेलही....
कर्नाटकातील काही वीरगळावर शिलालेख आढळतात, मात्र महाराष्ट्रात
असे शिलालेख असलेले वीरगळ क्वचित आहेत; किंबहुना नाहीतच. म्हणूनच वीरगळांना ‘इतिहासाचे
मुक साक्षीदार’ असेही म्हणतात. मी पाहिलेला तो वीरगळ कदाचित इतरांहून वेगळा असेलही....
मात्र तोही मुक साक्षीदार असल्याने बोलत नाही. आणि ती अबोल भाषा कळणारे त्याच्याकडे
बघत नाहीत. हीच शोकांतिका आहे....
सुरज मडके
भौतिकशास्त्र अधिविभाग,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
८२०८२८३०६९
