रामाण्णा

रुपाली आज घाईत होती. भाऊबीजेसाठी तिनं आरतीचं ताट सजवलं होतं, जुन्या चांदीच्या निरंजनांत तिनं तूप घातलं, सैपाकघरात देव्हाऱ्यासमोरच्या बाजूला पाट मांडून सुंदर रांगोळी काढली. नंतर प्रतिकला त्या पाटावर बसवून त्याला ओवाळलं. ओवाळणी म्हणून प्रतीकनं वडिलांकडून घेतलेले पन्नास रुपये दिले. ओवळताना त्याची चेष्टामस्करी चालूच होती.
"मी तुला लाडू देणार नाही"
"पन्नास रुपयात लाडू देऊ व्हय तुला"
"दे गं दिदे, आतापूरतं दे, पुढच्या वर्षी हजार देतो"
"हे बाबा घे! लई आलाय हजार देणारा"
"द्यायलाच लागणार! कारण तू जाणार ना इथून"
"लई शहाणा हैस, गप्प खा लाडू"
रामाण्णा तिथंच बसून हे सगळं बघत होता. पण काहीच बोलत नव्हता. त्याच्या मनात कायतरी वेगळंच चालू होतं. चार दिवसांपूर्वीच बँकेची नोटीस आली होती. त्यादिवशीपासून हा असाच शांत-शांत होता.
एकेकाळी आख्या गावात त्याचा दरारा होता. त्याचं खरं नाव रामगोंडा पाटील. त्याचे वडील शिवगोंड पाटील! या शिवाप्पानं व्यसनापायी शेती घालवली. जी काय दोनतीन एकर शिल्लक जमीन होती त्यात कष्ट करून रामाण्णा बायको-पोरं आणि म्हाताऱ्या बापाला सांभाळत होता.
सगळं काही नीट चालू होतं. पण गेल्या चार वर्षात त्याची परिस्थिती खूपच बिकट झाली होती. काहीकेल्या कर्ज फिटत नव्हतं. दोन वर्षं पुरात पीक वाहून गेलं आणि दोन वर्षं दुष्काळात करपून गेलं. पण बँकेला त्याचं काय सुखदुःख? थोडंफार जे ऊसाचं पैसं यायचं ते सोसायची कट करून घ्यायची, वरचं काही हातात यायचं ते चटणीमिठाला संपायचं. त्यात लेकीचं लग्न तोंडावर होतं. त्या खर्चाचं टेन्शन पण होतंच त्याच्या उरावर.
हे सगळं टेन्शन लपवून तो लेकरांचं हसणं-खिदळणं बघत बसला होता. अचानक त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक? मालकीणीनं दिलेला चहा अर्धाच सोडून तो उठला आणि तिला म्हणाला "जातो गं जरा रानात चाललोय."
"आवं च्या तर प्या की सगळा."
"राहूदे सोड, अर्धा....."
एवढं म्हणून तो शेतात गेला. थोडा वेळ त्यानं इकडंतिकडं केलं. काही वेळानं तो शेजारच्या चौगुल्याच्या तळावर गेला. तिथं नेमा चौगुल्याचा अभि होता. तो गोठ्यात जनावरं धूत होता.
रामण्णाला तिथं बघितल्यावर तो हातातलं काम सोडून त्याच्याकडं आला. आणि त्यानं विचारलं "आण्णा दिवाळी कशी गेली?"
"गेली बाबा, आली तशी गेली." "अबु! ते जरा 18 चा पाना असला तर दे"
"का ओ आण्णा?"
"चेंबर चालू करायचा हाय रे, जरा तण वाढलंय फवारणी करतो की, राऊंडअप आणलंय."
"पण पंप कुटं हाय ओ?"
"हाय रं रानात हाय तू दे लवकर"
एवढं बोलून रामाण्णा तिथून निघाला. तासाभराने तो परत आला. अभिला त्याचा पाना परत दिला. आणि म्हणाला "अबू, जरा पाणी देतोस काय रं? घसा कोरडा पडलाय."
अभि आतून पाणी घेऊन आला, त्याला तो पाणी देणार इतक्यात रामाण्णा कोसळला.
अभिला कळायचंच बंद झालं! रामाण्णाच्या तोंडातून फेस येत होता. त्यानं राउंडअप तणावर मारलं नव्हतं.
अभिनं त्याच्या वडिलांना व काही मित्रांना फोन केला. त्याला त्यांनी दवाखान्यात नेलं. घरात बातमी कळली. सकाळी हसलेल्या घरात आता रडायला पण कुणी नव्हतं; सगळेच दवाखान्यात पोचले.
बघता बघता बातमी गावभर पसरली. गावात चर्चेला एक विषय लागतो ना! आयता विषय मिळाला होता रिकामटेकड्यांना. उलटसुलट चर्चा सुरु झाल्या, काहींनी तर त्याच्या चारीत्र्यावरपण शिंतोडे उडवले. पण त्यांच्या तोंडाला कोण हात लावणार?
अथक प्रयत्नांनी रामाण्णा वाचला, बायकोनं मंगळसूत्र गहाण ठेऊन दवाखाण्याचं बिल भरलं.
संध्याकाळी शुद्धीवर आल्यावर रामाण्णा दोन्ही लेकरांना मिठीत घेऊन ढसाढसा रडला…
आज रामाण्णा वाचला नसता तर तो एकटा सुटला असता पण कुटुंबाचं काय झालं असतं?
अयोध्येतील रामाची उंची १५० मीटर की २०० मीटर? या प्रश्नाचं उत्तर आज त्याच्यासमोर गौण आहे. त्याच्यावर ही वेळ का आली? हा खरा प्रश्न आहे.
रुपाली, प्रतीक, त्याची बायको, त्याचा बाप हे सर्वजण आज आनंदाश्रू ढाळत आहेत, कारण त्यांचा डोंगराएवढा राम मृत्यूच्या दाढेतून परत आलाय ना!
©सुरज मडके

जोतिर्गमय

तिथी आजचीच! इसवी सन पूर्व ५२७ ची गोष्ट आहे; उत्तर भारतातील पावापुरी नगरीत ७२ वर्षे वयाचा एक चिरतरुण भ्रमण करीत आला होता. दिसताना तर तो विरक्त वाटत होता पण त्याच्याबरोबर त्याचा लवाजमा खूप मोठा होता. उपदेश मात्र त्याग-अहिंसेचा करायचा. त्यामुळे जनसमान्यांना तो एक अवलियाच वाटायचा. त्याच्या मुखावर एक वेगळीच प्रभा होती. त्याचं शरीर तापलेल्या सोन्यासारखं तेजस्वी होतं. कदाचित ते त्याच्या तपाचं फळ होतं. त्याचं आणखी एक विशेष म्हणजे तो जिथं जाईल तिथे संपन्नता त्याच्या आधी यायची म्हणे!
असा हा किमयागार! त्याच्याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता प्रचंड होती. नुसते मानवच नाही तर पशुपक्षीही त्याच्या आश्रयाला थांबायचे. त्याचा सहवास सर्वांनाच हवाहवासा वाटायचा. तो "ओम्" या शब्दाशिवाय काहीच बोलत नव्हता पण त्याच्या प्रत्येक ओम् चा अर्थ वेगळा होता. त्या ओमकार ध्वनित साऱ्या विश्वातील ज्ञान समावलं होतं असं सांगतात.
त्याच्या भूतकाळात डोकावून पाहिलं तर एक धक्कादायक प्रकार कळतो. त्याचा जन्म इ.पू.५९९ मध्ये वैशालीमधील कुंडलपुर येथे राजा सिद्धार्थ व माता त्रिशला यांच्या पोटी झाला होता. तो त्यांचा एकुलता एक पुत्र! त्याच्या जन्मापूर्वीच स्वर्गातील देवांनी त्याच्या स्वागताची तयारी केली होती. तो गर्भात यायच्या काळात इंद्र-कुबेरानी त्याच्या जन्मोत्सवाचा जल्लोष कसा असेल याची झलक दाखवली होती. सारी प्रजा सुखसमृद्ध झाली राज्य वृद्धिंगत झालं. फक्त त्याच्या जन्मामुळं! म्हणूनच या बालकाचा नाव 'वर्धमान' ठेवण्यात आलं. हाच बालक त्याच्या बाललीलांमुळे प्रसिद्ध होऊन सन्मती, वीर, अतिवीर व महावीर या नावांनीही नावारूपास आला. तिसाव्या वर्षी त्यानं सर्वस्वाचा त्याग करून दीक्षा घेतली बारा वर्षांच्या घोर तपानंतर त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली. ते ज्ञान घेऊन तो ४० वर्षे जगभर फिरला. माणसातील देव जागा करायची आशा तो उराशी बाळगून होता. आता तो जीवनाच्या अंतिम सत्याजवळ होता. आयुकर्म संपवून त्याला सिद्धालयात जायचं होतं. त्यानं अमावस्येचा मुहूर्त साधला अन् अखेर तो तेजोमय ज्ञानसूर्य मावळला. पण नियतीला ते मान्य नव्हतं. त्याचा शिष्य इंद्रभूती गौतम जो त्याची वाणी सर्वसामान्य जनतेस उलघडून सांगायचा त्यानं त्याचं दिवशी केवलज्ञान प्राप्त केलं. त्या काळोखात सूर्य सोडून गेला होता पण लगेचच एक दिवा प्रज्वलित झाला होता. आता ज्ञानाचा अंधार पडण्याची भीती राहिली नव्हती. म्हणूनच त्यावेेळीपासून ज्ञानाचा उत्सव दिव्यांनी साजरा करण्याची प्रथा पडली.
त्याच्या आयुष्यातील गर्भ, जन्म, दीक्षा, ज्ञान व निर्वाण या टप्यांना जैन संस्कृतीत कल्याणक असे संबोधतात. एकवेळ जन्म वगैरे कल्याणकारी असू शकतो पण निर्वाण (व्यवहार अर्थ: मृत्यू) हा कल्याणकारी कसा काय? डॉ. आ. ह. साळुंखे म्हणतात "अनेकांतवादाच्या दृष्टीनं पाहिलं तर मृत्यू हा फक्त देहाचा अंत असतो. त्याच्याकडे विघातक म्हणून न पाहता, विनाशक न मानता त्याला कल्याणक मानणं म्हणजे मृत्यूलाही अवीट सौंदर्य देणं आहे." आणि सर्वात महत्वाचं शरीराचा अंत हा ज्ञानाचा अंत नव्हताच मुळी! ते ज्ञान आजही जिवंत आहे. आणि तो तरी कुठं गेलाय? तो अजूनही जिवंत आहे आपल्यासारख्यांच्या हृदयामध्ये!
एक आर्त हाक द्या! त्याचं अस्तित्व नक्की जाणवेल.

*टीप:* सदर लेखात श्रीमदजिनेंद्र अंतिम तीर्थदेशना नायक भगवान महावीर यांचा एकेरी उल्लेख झाला आहे. हा उल्लेख आपुलकी व परमभक्तीपूर्वक केला आहे.
तसेच सहजपणा आणण्यासाठी काही ठिकाणी शास्त्रोक्त शब्द न वापरता व्यावहारिक शब्द वापरले आहेत.
©सुरज मडके

रामानुजन: 'अनंत' पाहिलेला अवलिया

अनंत किंवा इंफिनिटी (infinity) हा शब्द माहीत नाही असा व्यक्ति या जगाच्या पाठीवर क्वचितच असेल. किंबहुना अनंत म्हणजे नेमकं किती हा प्रश्न प्र...