अनंत किंवा इंफिनिटी (infinity) हा शब्द माहीत नाही असा व्यक्ति या जगाच्या पाठीवर क्वचितच असेल. किंबहुना अनंत म्हणजे नेमकं किती हा प्रश्न प्रत्येकाला एकदातरी पडला असेलच. काहीजण मनाला अनंत अशी उपमा देतात कारण मनाची परिमिती त्याचा आदी-अंत कधीच लागत नाही. एकांतवासात विचारमग्न असलेल्या व्यक्तीकडे पाहून आपण सहज म्हणतो, "अरे! कुठे शून्यात हरवलायस?" खरं पहिलं तर असा व्यक्ति आपल्यासाठी शून्यात असतो पण तो स्वतः विचारांच्या अनंत चक्रात फिरत असतो. अध्यात्मात आपण अनंतसुख, अनंतपद अश्या शब्दांना सामोरं जात असतो, पण अनंत म्हणजे किती हा अजूनही अनुत्तरित प्रश्न आहे. दहावीच्या त्रिकोणमितीत आपण tan 90 ची किंमत इंफिनिटी पाठ केली असेल. गणितामध्ये कोणत्याही संख्येला शून्याने भागले असता येणारे उत्तर इंफिनिटी असते. पण त्याची यथार्थ व्याख्या अजूनही पुसट आहे. विज्ञानाच्या गणितराणीचं हे कोडं विज्ञानराज भौतिकशास्त्रालाही सप्रमाण सोडवण्यात फारसं यश आलंय असं सांगता येणार नाही. अध्यात्मातलं 'अनंत' ज्यांने मिळवलंय त्यालाच माहीत!
जवळजवळ सव्वा शतकांपूर्वी भारतात एक असा माणूस होऊन गेला ज्यानं अंक आणि अध्यात्म यांची सांगड घालून दोन्हीतलं अनंत अनुभवलं. त्या अवलियाचं नाव श्रीनिवास रामानुजन! २२ डिसेंबर १८८७ साली तत्कालीन मद्रास प्रांतात जन्मलेल्या रामानुजनचं रॉबर्ट कॅनिगेलने लिहलेलं "The Man Who Knew Infinity" हे जीवनचरित्र प्रसिद्ध आहे, त्यावर आधारित त्याच नावाचा चित्रपट हॉलीवुडने २०१५ साली प्रदर्शित केला. ब्रिटिश अभिनेता देव पटेल व अमेरिकन अभिनेत्री देविका भिसे यांनी त्यात रामानुजन व पत्नी जानकीअम्मल ही जोडी उत्तम साकारली आहे. रामानुजन ह्या व्यक्तीने आयुष्य गणिताला समर्पित केलं होतं, त्यामुळे अर्थातच पती-पत्नीच्या नात्यापेक्षा प्रा. हार्डी यांच्यासोबतचा त्यांचा संवाद या चित्रपटात पहायला मिळतो. त्यातील एका संवादात रामानुजन म्हणतो, "मी माझं आयुष्य गणिताला अर्पण केलंय". लहानवयात त्याने सोडवलेली अवघड गणितं आणि मांडलेली प्रमेयं त्याच्या अपूर्व बुद्धिमत्तेची व समर्पणाची साक्ष देतात. त्याला जळी-स्थळी जणू गणित दिसायचं अंकांशी खेळण्यासाठी त्याला मंदिरातल्या पाषाणशिलाही कमी पडायच्या. गणिताचं हे वेड त्याच्या डिग्रीच्या आड आलं, गणितात प्रवीण असणारा रामानुजन इतर विषयात खूप कमी पडला, त्यामुळं कॉलेजची डिग्री तो मिळवू शकला नव्हता.
मॅट्रिकच्या शिक्षणावर त्यानं नोकरी मिळवली पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळच होतं. त्याच्या काही हितचिंतकांनी त्याचं संशोधनकार्य केंब्रिजच्या प्रा. हार्डी यांच्यापर्यंत पोचवण्यास मदत केली. कालांतराने रामानुजनला प्रा. हार्डींकडे जाऊन एकत्र काम करण्यासाठी संधी मिळाली. अट्टल धार्मिक संस्कार असलेल्या घरात समुद्रलंघनाला विरोध साहजिक होता. पण जानकीअम्मलच्या मध्यस्थीमुळे अखेर विरोध निवळला. इंग्लंडला जाताना "तिथे जाऊन स्वतःला बाटवून घेऊ नकोस, धार्मिक संस्कार विसरू नकोस" असं सांगायला त्याची आई विसरली नव्हती. जानकीने तर हृदयावर दगड ठेवून त्याला निरोप दिला होता.
तिकडे गेल्यावर त्याने आईचा शब्द शेवटपर्यंत मोडला नाही, शाकाहार-देवपूजा याबाबतीत त्याने कधीच तडजोड केली नाही. गणिताची आवड त्याला तिथेही होतीच मात्र संसाराची ओढही होती. एका प्रसंगात रामानुजन प्रा. हार्डींना म्हणतो, "मी विवाहित आहे, मला माझं संशोधन पब्लिश करून लवकर घरी जायचंय."
तरुण रक्ताचा रामानुजन व मुरब्बी हार्डी यांच्यातील संवाद जीवन शिकवतो. रामानुजनला पब्लिकेशनची घाई होती, त्याचं अनाकलनीय संशोधन जगापुढे मांडायला तो उतावीळ झाला होता, मात्र "ये बेरहम जमाना प्रूफ मांगता है" असं त्याला समजेल अश्या भाषेत सांगून हार्डींनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही हट्टाला पेटलेल्या रामानुजनला त्यांनी ग्रंथालयात नेऊन महान गणिततज्ज्ञांच्या वह्या दाखवल्या आणि भविष्यात तुझीही वही इथे असली पाहिजे अशी अंतःप्रेरणा त्याच्या मनात जागवली. त्याला वर्गात बसवून त्याची B.Sc. डिग्री पूर्ण करून घेतली. त्यांनी त्याच्या सिद्धांत मांडणीतील उड्या व त्रुटी दाखवून दिल्या. सहकारी म्हणून आला असला तरी रामानुजन एका अर्थाने हार्डींचा विद्यार्थीच होता. एक हितदक्ष शिक्षक विद्यार्थ्याची किती काळजी करतो हे हार्डींनी दाखवून दिलं. त्याची तब्येत बिघडल्यावर हार्डींनी त्याची खूप काळजी घेतली. त्रिनीटी कॉलेजकडून त्याला फेलोशिप मिळावी म्हणून खूप प्रयत्न केले पण त्यांना त्यात अपयश आलं मग त्यांनी रॉयल सोसायटीच्या दरबारात कित्येकांचा विरोध पत्करून रामानुजनची शिफारस केली, त्यात त्यांना यश आलं त्यानंतर त्रिनीटी कॉलेजनेही रामानुजनला फेलोशिप बहाल केली.
एकदा हार्डींनी रामानुजनला त्याच्या गणितातल्या अद्भुत किमयेबद्दल विचारलं, त्यावर रामानुजनने आपल्यावर कुलदेवता नामगिरी देवीचा वरदहस्त असल्याचे सांगितले; त्याच्या प्रत्येक गणितिय कर्तुत्वचं श्रेय तो त्या देवीला द्यायचा. ती देवी त्याला गणिताच्या उकली सांगायची अश्या कथाही काहीवेळेस रंगवल्या जातात. त्याचा दैववाद इतका प्रबळ होता की तो म्हणायचा की, "ज्या समीकरणात दैवी विचारांची मांडणी नसते ते माझ्यासाठी अर्थहीन आहेत." त्याच्या आयुष्यात त्याचं आजारांशीदेखील एक समीकरण जुळलं होतं, तरीही त्याच्या मनातली ईश्वराप्रति श्रद्धा अढळ राहिली हेही एक विशेष मानायला हवं.
त्याचे दुसरे सहकारी प्रा. लिटलवूड रामानुजनबद्दल म्हणाले होते, "सगळे धन पूर्णांक (positive integer) रामानुजनचे वैयक्तिक मित्र होते." खरंच आहे, नेहमी रामानुजनभोवती सावलीप्रमाणे घुटमळणाऱ्या अंकांना मित्र नाहीतर अजून काय म्हणावं?
त्यानं तिथं राहून भरपूर संशोधन केलं, पण आजारपण आणि कुटुंबाच्या ओढीमुळे त्याचा जीव तळमळत होता. पण, त्या गणिती हृदयाला सावरकरांप्रमाणे "ने मजसी ने परत मातृभूमीला........" असं काव्य करता आलं नाही एवढचं!
अखेर तो १९१९ साली भारतात परतला. यश, कीर्ती व नाव मिळवून आलेल्या रामानुजनसोबत अंक व आजारपण हे जुने सोबती होतेच. मृत्यूशय्येवरदेखील रामानुजनने अंकसख्यांशी खेळणं सोडलं नाही, अजूनही तो प्रा. हार्डींसोबत पत्रव्यवहार करतच होता. खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी अंक सखे झाले होते. अनंत संख्यांशी खेळत खेळत वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी २६ एप्रिल १९२० ला अनंत काय असतं हे न सांगताच तो अनंतात विलीन झाला.
त्यानं मांडलेल्या समीकरणांच्या रूपात तो अजूनही जीवंत आहे. मृत्यूनंतरही तो अनेक गणिततज्ज्ञ व शास्त्रज्ञांसाठी दीपस्तंभ म्हणून राहिला. नेचर नियतकालिकाने त्याला Calendar of Scientific Pioneers च्या यादीत स्थान दिलं, भारतात त्याचा जन्मदिवस 'राष्ट्रीय गणित दिन' म्हणून साजरा होतो, त्याच्या नावे अनेक पुरस्कार व छात्रवृत्या विविध संस्थांकडून वितरित होतात. त्याचं स्मारकदेखील तयार केलं गेलंय. एवढ्या सगळ्या त्याच्या कार्यकर्तुत्वात जानकीअम्मलचं स्थानही खूप मोठं आहे. कारण तिच्या त्याग व पाठबळातून रामानुजन नावारूपास आला, हे नाकारून चालणार नाही. प्रत्येक रामाला अश्या जानकीची उज्ज्वल साथ गरजेची असतेच, हे ह्या जोडीनं पुन्हा सिद्ध केलंय.
✍सुरज मडके, केशव राजपुरे
भौतिकशास्त्र अधिविभाग,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर